येचली रेती प्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावणार – संतोष ताटीकोंडावार यांचा ‘अल्टीमेटम’

73

येचली रेती प्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावणार
– संतोष ताटीकोंडावार यांचा ‘अल्टीमेटम’

भामरागड तालुक्यातील येचली घाटातून रेती वाहतूकीसाठी केलेल्या करारनाम्यानुसार रेतीचे उत्खनन न करताच प्रशासकीय अधिका-यांशी संगनमत करुन तिथूनच रेतीचा उपसा केल्याचे दाखवून हजारो ब्रास रेतीची अफरातफर करुन कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावर तक्रार, निवेदन सादर करुनही वर्षाचा कालावधी लोटूनही या प्रकरणी कोणतीच कारवाई न करता संबंधितांना अभय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. येत्या तीन दिवसात तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यास थेट न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनातून दिला आहे.
सन 2021-22 साठी येचली रेती घाट उपसा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागांतर्गत जीएसडी इंडस्ट्रीज भामरागड यांचेसोबत करारनामा करण्यात आला होता. मात्र संबंधित कंत्राटदाराने सदर रेती घाटातून रेतीचे उत्खनन करताच प्रशासकीय अधिका-यांना हाताशी धरुन बनावट वाहतूकीचा परवाना तयार करुन 2115 ब्रास रेतीची वाहतूक केल्याचे दाखविण्यात आले. करारनाम्याचे भंग झाल्याचे तसेच रेती प्रकरणात कंत्राटदाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने ताटीकोंडावार यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतरही भामरागडचे तहसिलदार यांनी संबंधित अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. तर कंत्राटदारावर केवळ 563 ब्रास रेती परवानावर 1 कोटी 19 लाख रक्कमेचा दंड आकारला. मात्र उर्वरित बेकायदेशीर रेतीवर दंड आकारला नाही. यासंदर्भात सप्टेंबर 2023 व डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्ज केला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही कार्यालयाद्वारे कंत्राटदारासह संबंधित अधिका-यांवर कार्यवाही करण्यात आली नाही.
गैरप्रकार करणा-या कंत्राटदासह संबंधित अधिकारीवर कारवाई करण्यास बराच विलंब होत असल्याचा आरोप करीत तक्रार संतोष ताटीकोंडावार यांनी आज, गुरुवारी जिल्हाधिका-यांनी निवेदन सादर केले आहे. येत्या तीन दिवसात संबंधित कार्यवाही न झाल्यास मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल करुन प्रकरणाच्या चौकशीकरिता दाद मागणार असल्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे.