शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणा ठप्प
गडचिरोली:- राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत गेल्या १७ वर्षापासून कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी दि.२५ ऑक्टोबर २०२३ पासून कायमबंद आंदोलन पुकारलेला आहे. यासाठी मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी शासनाची कानउघाडनी करून सदर कर्मचार्यांना शासन सेवेत दि.३१ मार्च २०२३ पूर्वी सामावून घेण्याचे आदेश दिले.तसेच विधानसभा व विधान परिषदेत मा.सदस्य यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देतांना मा.आरोग्यमंत्री यांनी सदर अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत शासन सकारात्मक असून दि.३१ मार्च २०२३ पूर्वीच धोरणात्मक निर्णय घेण्याचे शासनाचे वतीने जाहीर केले.
परंतु सदर बाबीस ६ महिन्यापेक्षा जास्तकाळ होऊनही शासन स्तरावरून कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी मागील १३ दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु केले.या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणेवर खूप मोठा प्रभाव पडल्याने शासनाने या आंदोलनाकडे गंभीरतेने घेऊन या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे असे आंदोलनकर्ते कर्मचारी यांचे म्हणणे आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी बिनशर्त वयाची अट शिथिल करून रिक्त पदावर समयोजन करण्यात यावे या मागणीसाठी संघटनेचा वतीने
यापूर्वी शासनास वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात १६ ऑक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन असे म्हटले होते . परंतु सरकारला गांभीर्याने विचार करण्याचा वेळ मिळावा म्हणून १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी १ दिवसीय राज्यव्यापी आंदोलन नागपूर येथे करण्यात आले. तसेच दिनांक १७ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यात १ दिवसीय धरणे, मोर्चे व लेखणी बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र शासनाने दखल न घेतल्याने २५ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. शासनाने समयोजनाची प्रक्रिया पार न पाडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने मागील १३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात संघटनेचे समन्वयक जितेंद्र कोटगले, नीलेश सुभेदार, सदस्य मयुर कोडापे यांच्यासह मोठ्या संख्येने इतर आरोग्य विभागात कार्यरत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आंदोलनात जिल्हाभरातील आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने आरोग्य यंत्रणा ठप्प पडली आहे.