अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या मागणीला यशखे अखेर ‘त्या’ हत्येचा पोलिसांनी केला उलगडा

298

 

अखेर ‘त्या’ हत्येचा पोलिसांनी केला उलगडा

मुलचेरा :- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ट मोहूर्ली गावात १८ सप्टेंबर रोजी गावालगत आसलेल्या बिएसएनएल टॉवर जवळ खड्ड्यातील पाण्यात रामूलू अलाम वय (४०) या इसमाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची योग्य चौकशी करुन कारवाई करा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेराच्या वतीने करण्यात आली होती या मागणीला यश मिळाले आहे. या घटनेने संपूर्ण गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. हि घटना आत्महत्या नसुन हत्या करण्यात आले असे संशय गावातील नागरिक करीत असुन सदर घटनेची तात्काळ योग्य चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या वतीने तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट, सचिव उमाकांत आत्राम, ग्रामसभा अध्यक्ष दिवाकर गावडे, मुन्नाजी नैताम, रविंद्र वनकर, वासुदेव मडावी, किर्तिमराम आलाम, वासुदेव ची. मडावी, गिरीदास आलाम, दिलिप आलाम, अनिल मेकलावार, ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर मरापे, चंद्रशेखर आत्राम, तालुका संघटक महेंद्र आत्राम, तालुका उपाध्यक्ष संदिप तोरे, चंद्रशेखर नैताम, संतोष आलाम, सचिन सिडाम, सुनंदा सिडाम, ग्रामपंचायत सदस्य दिक्षा नैताम, कल्पना दुर्गे, सुमन मारकवार, सुनिता मडावी, छाया आलाम, माया दुर्गे यांनी मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन, मुलचेरा यांच्याकडे निवेदाद्वारे केली होती.
गावात याबाबत कोणी बोलण्यासाठी तयार नसल्याने व
हातात शवविच्छेदन अहवाल नसल्याने पोलिसांपुढे हत्या की आत्महत्या या घटनेचा छडा लावणे कठीण झाले होते. मात्र तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका महिन्यात पोलीसांनी त्या घटनेचा उलगडा केला असुन एकाच कुटुंबातील पाच जणांना व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करनाऱ्या एकाला असे तब्बल सहा आरोपींना मुलचेरा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असुन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या मागणीला यश मिळाले आहे.
संतोष अंकुलु मोगीलवार (वय ३२), कविता संतोष मोगीलवार (वय ३०), गट्टू अंकुलू मोगीलवार(वय३५),चंद्रय्या मोंडी मोगिलवार (वय३५), श्यामराव चंद्रय्या मोगीलवार आणि शरद गिरमाजी मडावी (वय ३८) सर्व रा. मोहूर्ली ता. मुलचेरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

सदर घटना अशी की, रामुलू अलाम हा मागील काही दिवसांपासून संतोष मोगीलवार यांच्याकडे शेळी राखण्याचा काम करीत होता. संतोष मोगीलवार हा शेतीसोबतच हातभट्टीवर दारू गाळून आपल्या घरी चोरी मार्गाने विक्री करायचा. पोलिसांचे दारू पकडण्याचे धाडसत्र सुरु असल्याने भीतीपोटी त्याने दारू आपल्या घरी न ठेवता शेतात ठेवण्यासाठी मृतक रामुलू आलाम याला सांगितले. मात्र त्याने ती दारू पिल्याने रागाच्या भरात संतोषची पत्नी कविता मोगीलवार हिने रामुलू आलाम याला त्याचा घरी जाऊन १७ सप्टेंबर रोजी काठीने मारहाण केली . त्याच दिवशी संध्याकाळी रामुलू आलाम याला आरोपी संतोष मोगीलवार आणि त्याच्या पत्नीने आपल्या घरी बोलावून पून्हा बेदम मारहाण केली. त्याचा डोक्याला मागील बाजूला मार लागल्याने तो खाली पडला . रागाच्या भरात त्यांनी त्याचा गळा दाबून हत्या केली. यासाठी संतोषचा भाऊ गट्टू अंकुलू मोगीलवार, काका चंद्रय्या मोंडी मोगिलवार , चुलत भाऊ (काका चंद्रय्याचा मुलगा )श्यामराव मोगीलवार यांनी मदत केली होती. तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शरद गिरमाजी मडावी यांनी मदत केली. या सर्वांना मुलचेरा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रात्रीच्या सुमारास आपल्या घरी जाताना शरद गिरमाजी मडावी हा संतोष मोगीलवार याचा घरी दारू पिण्यास गेला होता. संतोषने त्याला दारू दिली. मात्र तो गडबडीत पैसे न घेतल्याने शरद हा संतोषला पैसे देण्यासाठी घरात शिरला. पैसे देऊन घराबाहेर निघताना संतोषने शरदला या घटनेची माहिती मिळाली समजून त्याची कॉलर पकडून ‘या’ घटनेची माहिती बाहेर सांगितल्यास तुला पण जिवानिशी मारणार , अशी धमकी देत मदत करण्यास सांगीतले. मात्र त्याला याबाबत काहीच माहीत नव्हते. तो घाबरून मदत करण्यास तयार झाला.
घटनेचा तपास मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संदिप साखरे, महिला पोलिस उप निरीक्षक दिपाली कांबळे, महिला पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा खापे, पोलीस हवालदार विष्णू चव्हाण, चरणदास कुकुडकर, रोशन पोहनकर आदींनी केला.