अहेरी:- मागील दोन ते अडीच वर्षापासून कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावले शिवाय गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शिवाय शेतीवर अवलंबून असणारा मजूर वर्ग, गोरगरीब जनताही यामुळे त्रस्त झाली आहे. या गोरगरीब जनता, कार्यकर्ते आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मला जिल्हा परिषदेच्या विविध पदांवर विराजमान होता आले. त्यामुळे हार पुष्पगुच्छ आणि इतर गोष्टीवर खर्च करून आनंद व्यक्त करण्यापेक्षा जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करा हाच माझा खरा सत्कार असल्याचे भावनिक आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.
6 ऑक्टोबर रोजी ताईंचा वाढदिवस असून जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दरवर्षीच विविध कार्यक्रम तसेच हार,पुष्पगुच्छ आणि इतर गोष्टीवर खर्च करून आनंद व्यक्त करतात. मात्र गोरगरीब आणि मजूर वर्ग तसेच शेतकऱ्यावर आलेले संकट लक्षात घेता असे खर्च टाळून जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करा हाच माझा खरा सत्कार असल्याचे भावनिक आवाहन भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले आहे.
प्रत्येकाला माझा सत्कार करावा असे वाटत असून याबाबत त्यांच्या मनामध्ये मोठा उत्साह आहे. त्यांची ही भावना मी समजू शकते, परंतु या नव उत्साहातून हार, पुष्पगुच्छ, फटाके, मिठाई, ढोल आदींवर होणारा खर्च शेवटी अनाठाईच ठरणार आहे. मी स्वतः एक सामान्य कार्यकर्ती असून मला समाजातील गोरगरीब होतकरू घटकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे अशा प्रसंगाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील गोरगरीब गरजूंना मदत केल्यास मला मनस्वी आनंद होईल आणि तोच माझा खरा सत्कार ठरणार असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.