अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली: कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांची दुसरी निवासी प्रशिक्षण बॅच आज रोल प्रशिक्षण केंद्र, ता. अहेरी येथे रवाना करण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अरुण वसवाडे सर, उमेद विभाग प्रमुख बोरुडे सर तसेच पाणी फाउंडेशन टीम उपस्थित होती.तालुका कृषी अधिकारी अरुण वसवाडे यांनी एसटी बसची विधिवत पूजा करून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हिरवा झेंडा दाखवून प्रशिक्षणार्थ्यांची गाडी प्रशिक्षण केंद्राकडे रवाना करण्यात आली.
महाराष्ट्रातील ३५१ ग्रामीण तालुक्यांमध्ये कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विशेषतः एटापल्ली तालुका हा संपूर्ण आदिवासी व दुर्गम भाग असून येथे प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. याच अनुषंगाने या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, जैविक शेती, विषमुक्त शेती, समूह शेती तसेच उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्यक्ष कृती, प्रात्यक्षिके आणि खेळाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना सहज आणि परिणामकारक पद्धतीने ज्ञान मिळणार आहे.
सध्याच्या काळात एकट्याने शेती करण्यापेक्षा समूहाने शेती करणे अधिक परिणामकारक ठरत असून या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये संघटन आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होणार आहे. जिल्हा व राज्य स्तरावर भरघोस बक्षिसांची तरतूद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमात कृषी विभागाचा मोलाचा वाटा असून दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम निश्चितच परिवर्तन घडविणारा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






