गट्टा शाळेत ९वी-१०वी वर्ग सुरू करण्याची मागणी; भाकपा व ग्रामस्थांचे निवेदन

250

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : तालुक्यातील गट्टा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ९वी व १०वीपर्यंतचे वर्ग तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी ठाम मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. गट्टा हे परिसरातील मध्यवर्ती गाव असून आजूबाजूच्या अनेक लहान-मोठ्या गावांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मात्र, सध्या शाळा केवळ इयत्ता ८वीपर्यंतच उपलब्ध असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, ही गंभीर अडचण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण व आदिवासी भागातील बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणे परवडत नाही. वाहतूक सुविधांचा अभाव, राहण्याची अडचण आणि सुरक्षेच्या कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर याचा अधिक परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. त्यामुळे गट्टा येथेच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल आणि ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या मागणीसंदर्भात आयोजित बैठकीत आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सैनुजी गोटा, भाकपाचे तालुका सहसचिव विशाल पूज्जलवार, मुख्याध्यापक मंतय्या बेडके, गाव पाटील कन्ना होता हेही उपस्थित होते, तसेच ग्रामविकास अधिकारी मनोज मेश्राम, तानेंद्र लेकामी, मिथुन मल्लिक यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने प्रशासनाने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सुहास गाळे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गट्टा येथील शाळेत ९वी व १०वीचे वर्ग सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.