खाजगी पंपांवर इंधन मुबलक, सरकारी पंप कोरडा; एटापल्लीत संशयाची छाया – भाकपाचे सुरज जक्कुलवार व शुभम वनमवार यांची मागणी

346

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत सुरू असलेल्या सरकारी पेट्रोल पंपावर मागील अनेक दिवसांपासून डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाकपाचे कार्यकर्ते सुरज जक्कुलवार व शुभम वनमवार यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीच्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना खाजगी पेट्रोल पंपांकडे वळावे लागत आहे. मात्र, खाजगी पंपांवर इंधन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारी पंपावरच इंधनाचा तुटवडा का निर्माण होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, इंधनाअभावी केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर विविध शासकीय कामकाजावरही परिणाम होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी व आपत्कालीन सेवांशी संबंधित वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी रुग्णवाहिका व शासकीय वाहनांच्या हालचालींवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे.याशिवाय, खाजगी पेट्रोल पंप मालकांना फायदा मिळावा यासाठी जाणीवपूर्वक सरकारी पंपावरील इंधन पुरवठा रोखला जात आहे का, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी ठाम मागणी सुरज जक्कुलवार यांनी केली आहे.तसेच, संबंधित अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या पेट्रोल पंपावर तात्काळ डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून द्यावे आणि इंधन अनुपलब्धतेमागील कारणांची लेखी माहिती जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नागरिकांना पारदर्शक माहिती मिळावी व भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण एटापल्ली तालुक्याचे लक्ष लागले आहे.