देसाईगंजमध्ये राईस मिलविरोधात नागरिकांचा संताप; प्रदूषणामुळे कारवाईची मागणी

152

देसाईगंज | दि. ९ मार्च २०२६

देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील तुळशी मार्गावरील मायाश्री ॲग्रो इंडस्ट्रीज या राईस मिलविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे. राईस मिलच्या संचालिका राधिका आकाश अग्रवाल यांनी केवळ कच्च्या तांदूळ प्रक्रियेसाठी परवानगी घेतली असताना, बेकायदेशीरपणे उसना तांदूळ तयार केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सदर राईस मिलच्या चिमणीमधून मोठ्या प्रमाणात धोकादायक धूर निघत असून तो थेट लगतच्या भगतसिंग वार्ड व नैनपूर वार्डातील घरांमध्ये पसरत आहे. तसेच उसना तांदूळ तयार करताना जाळलेल्या कोंढ्यापासून तयार होणारी राख अवैधरित्या शेजारील शेतांमध्ये टाकली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ही राख वाऱ्यामुळे उडून वार्डातील घरांमध्ये तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये जात असल्याने डोळ्यांचे आजार आणि अपघातांची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे व डोळ्यांचे विविध आजार होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
या संदर्भात भगतसिंग वार्ड व नैनपूर वार्डातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी दिल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पुन्हा एकदा अवैधपणे राख टाकण्यात आल्यामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन विनापरवानगी उसना तांदूळ तयार करणाऱ्या राईस मिलच्या संचालिका राधिका अग्रवाल यांच्यावर प्रदूषण नियंत्रण नियमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा व संबंधित राईस मिल तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयाकडे लेखी तक्रारीतून केली आहे.
तक्रारीनुसार यथाशीघ्र कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.