अखेर राजाराम येथे धान खरेदी केंद्र उदघाटन होणार

312

राजाराम : अहेरी तालुक्यातील कमलापूर धान खरेदी केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या राजाराम गावातील शेतकऱ्यांनी गावात स्वतंत्र धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी पुढाकार घेत (TDC) उपप्रादेशिक व्यवस्थापक राजुरे साहेब यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व समस्या मांडत राजाराम येथे तातडीने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

राजाराम व परिसरातील बहुतांश शेतकरी धान पिकावर अवलंबून आहेत. दरवर्षी शेतकरी मोठ्या मेहनतीने धान पिकवतात; मात्र खरेदी केंद्र गावात नसल्यामुळे धान विक्रीसाठी कमलापूरसारख्या दूरच्या केंद्रावर जावे लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो तसेच वेळेचा अपव्यय होतो. अनेक वेळा ट्रॅक्टर किंवा वाहनांची सोय करणे कठीण जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो, अशी व्यथा शेतकऱ्यांनी राजुरे साहेबांसमोर मांडली.

शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत उपप्रादेशिक व्यवस्थापक राजुरे यांनी राजाराम गावातील परिस्थिती लक्षात घेऊन लवकरच येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राजाराम येथे धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून धान विक्रीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

धान खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी राजाराम गावातील सत्यय्या गड्डमवार, संतोष तोर्रेम, मधुकर मोतकुरवार, सुभाष मारगोनवार, गंगाराम चंदनखेडे, रमेश गड्डमवार, शंकर गोंगले, हणमंतु गोंगले, बापू दुर्गे व बोन्दय्या दुर्गे यांनी TDC कार्यालयाला भेट देऊन निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नामुळे लवकरच राजाराम येथे धान खरेदी केंद्र सुरू होईल, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.