गोंडवाना विद्यापीठात सांस्कृतिक उत्सवाची धूम; तीन दिवसीय ‘भरारी’ आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांतून तरुणाईच्या कलागुणांना व्यासपीठ

56

*गडचिरोली :-* गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘भरारी २०२५-२६’ या तीन दिवसीय आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तरुणाईच्या कलेचा, सर्जनशीलतेचा आणि आत्मविश्वासाचा संगम घडवणारा हा महोत्सव विद्यापीठ परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, वडसा येथील प्राचार्य डॉ. श्रीराम गहाणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मौसीनभाई जवेरी महाविद्यालय, वडसा येथील प्राचार्य डॉ. नरेंद्र आरेकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील ललित कला विभागाच्या विभागप्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम, सहा प्रा. डॉ. प्रदीप चापले, मराठी विभाग प्रमुख डॉ. सविता गोविंदवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांना रंगतदार सुरुवात झाली. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, फिल्म मेकिंग, पेंटिंग, पोस्टर, क्ले मॉडेलिंग, चित्र कोलाज, रांगोळी, फोटोग्राफी, समूहगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय तालवाद्य, वेस्टर्न सोलो, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल, नाट्यसंगीत, मिमिक्री, स्किट, एकांकिका, माईम आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
०५ ते ०७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक युवा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. संगीत, नृत्य, अभिनय आणि विविध कलांच्या माध्यमातून तरुणाईच्या सर्जनशीलतेची झलक या महोत्सवातून पाहायला मिळत आहे. दरवर्षी आयोजित केला जाणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी दिशा देत त्यांना उंच भरारी घेण्याची प्रेरणा देत आहे.