उप संपादक: तेजेश गुज्जलवार
अहेरीवरून आल्लापल्लीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास लोकबिरादरी व प्राणहिता पोलीस कॅम्पदरम्यान ही घटना घडली. या अपघातात ऑटोमधील आठ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
ऑटो उलटल्याने उडाली भीतीची लाट
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 33 डब्ल्यू 0048 क्रमांकाचा प्रवासी ऑटो अहेरीवरून आल्लापल्लीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की ऑटो रस्त्यावरच उलटला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जखमींची माहिती
या अपघातात ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख (४१, रा. अहेरी) यांना छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासह
तनवीरजा गफूर शेख (२८, अहेरी)
हुसनबी सरवर शेख (६०, अहेरी)
जमीला हसन शेख (४७)
ममता वेलादी (२५, भंगारमपेठा)
श्यामला येमुलवार (३९, अहेरी)
शांता गडडमवार (६५, कोत्तुर)
मंगेश मेश्राम (३७, नवेगाव)
हे सर्व जखमी झाले आहेत.
तिघांना चंद्रपूरला रेफर
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत सर्व जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख, मंगेश मेश्राम आणि ममता वेलादी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथील रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
*पोलिसांचा तपास सुरू*
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे पुढील तपास करीत आहेत.
भरधाव वाहनचालकांच्या बेफिकीर वेगामुळे पुन्हा एकदा निरपराध प्रवाशांचे जीव धोक्यात आल्याची तीव्र संतापजनक बाब समोर आली आहे. स्थानिकांकडून अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.







