एटापल्लीतील खड्डेमय रस्त्यांविरोधात पत्रकारांचे बेमुदत साखळी उपोषण; शासनाने तात्काळ दखल घ्यावी – अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

336

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील अत्यंत खराब, खड्डेमय व अपघातास निमंत्रण देणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्ती व नव्याने कामांना तात्काळ मंजुरी देऊन कामास सुरुवात करावी, या मागणीसाठी तालुक्यातील सन्माननीय पत्रकार बांधवांनी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास शासन व प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्वी करण्यात आलेली अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची व बोगस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी सदर रस्ते आज पूर्णतः नासधूस होऊन मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेले आहेत. या रस्त्यांवरून ये-जा करताना वारंवार लहान-मोठे अपघात घडत असून नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. विशेषतः गरोदर महिला, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण यांना वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात नेणे कठीण होत असून काही वेळा जीवितहानीस सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर एटापल्ली ते देवदा–गडचिरोली, एटापल्ली ते जारावंडी, एटापल्ली ते हेडरी–गट्टा तसेच इतर मागणी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन तात्काळ काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक बांधिलकी जपत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. मात्र या प्रकरणी कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर पत्रकारांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला, ही बाब दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी राष्ट्रीय लोक न्यास आंदोलन तथा भारतीय जनसंसद, जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. शासनाने पत्रकारांच्या रास्त मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या मागणीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अप्पर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, गडचिरोली यांना निवेदन सादर करण्यात आले असून, शासन-प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या कामांना सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.