अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजता ध्वजारोहणाचा भव्य व अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात उपविभागीय अधिकारी मा. राऊत साहेब यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून देशप्रेमाची भावना व्यक्त केली. यावेळी संपूर्ण परिसर “भारत माता की जय” व “वंदे मातरम्”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वामुळे कार्यालयीन परिसरात देशभक्ती, एकात्मता व राष्ट्रीय अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच एटापल्ली तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात विशेष चैतन्य निर्माण झाले होते. शिस्तबद्ध रांगा, स्वच्छ व सुसज्ज प्रांगण तसेच नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे सोहळ्याची प्रभावी मांडणी दिसून आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली तसेच मदरलँड इंग्लिश मिडियम स्कूल, एटापल्ली येथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्ये, भाषणे व नाट्यछटा सादर करून राष्ट्रप्रेम, संविधानिक मूल्ये व स्वातंत्र्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. या कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विशेष रंगत आणली.
यावेळी उपविभागीय अधिकारी मा. राऊत साहेब यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये तसेच नागरिकांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करताना देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहित जपण्याचे आवाहन केले.
पोलीस प्रशासन व इतर शासकीय यंत्रणांच्या समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत, सुरक्षिततेत व शिस्तीत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाले.
एकूणच एटापल्ली येथे शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा करण्यात आलेला ७७ वा प्रजासत्ताक दिन हा शिस्त, एकता व राष्ट्रप्रेमाचा आदर्श ठरला असून, या उपक्रमांनी नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ केली.







