अहेरी (गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी शहर आणि नगरपंचायत हद्दीत नियमबाह्य व अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली असून, स्थानिक नगरपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप ‘जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती, महाराष्ट्र’ चे जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. याबाबत समितीने थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी अर्ज (दि. १४/१२/२०२५) करून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गंभीर आरोप आणि स्थिती:
* अतिक्रमणाचे स्वरूप: अहेरी शहरातील गांधी चौक, तहसील कार्यालय, गांधी चौक ते न्यायालय, तसेच गांधी चौक ते नगरपंचायत कार्यालय या महत्त्वाच्या ठिकाणांवरील रस्त्यांच्याकडेला नगरविकास नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर बांधकामे करण्यात आली आहेत.
* प्रशासनाचे दुर्लक्ष: तक्रारकर्त्यांच्या मते, बांधकामांना परवानगी देण्याचे संपूर्ण अधिकार नगरपंचायत कार्यालयाकडे असताना, अनेकदा तक्रार करूनही संबंधित कार्यालय कोणतीही कारवाई करत नाही.
* राजकीय वरदहस्त: सदरची बेकायदेशीर बांधकामे राजकीय दबावामुळे व सुसूत्रबद्ध नियोजनाखाली केली जात आहेत. या बांधकामांमध्ये रस्त्यांवर व इतर सार्वजनिक जागांवर अतिक्रमण केले जात आहे.
मागणी आणि इशारा:
तक्रार अर्जामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संगनमत असून, ‘भोंगळ व पक्षपाती’ कारवाईकडे लक्ष देऊन नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे.
अन्यथा, ‘नाईलाजास्तव ‘ नगरविकास कार्यालय, गडचिरोलीपुढे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे. तसेच, सदर निवेदनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईची माहिती तात्काळ समितीला कळवावी, अशी विनंती केली आहे.







