काॅलेज रस्त्यावरील खड्डा अखेर पोलिसांनीच मुजवला सपोनि रविंद्र भोरे यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक

170

प्रतिनिधी//

सातारा: कराड तालुक्यातील उंब्रज येथील कॉलेज रोडची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. शेवाळे इलेक्ट्रिकल्ससमोर पडलेला एक मोठा खड्डा तर अपघातांना आमंत्रण देत होता.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारी उंब्रज पोलिसांनीच स्वतः पुढाकार घेत हा खड्डा बुजवण्याचे औदार्य दाखवले. पोलिस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी पाटील यांनी खड्ड्यात भराव टाकून रस्ता समतल केला. पोलिसांच्या या पुढाकाराचे नागरिकांकडून जोरदार कौतुक होत आहे.

सपोनि रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली. स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा घटनास्थळी धाव घेणारे भोरे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक कामात सहभाग नोंदवला आहे. त्यांनी संबंधित विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीबाबत माहिती देऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या कॉलेज रोडवरून दररोज हजारो विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची वर्दळ असते. कारण या रस्त्यावर शैक्षणिक संकुल, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुधन केंद्र, व्यावसायिक दुकाने अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. पाईपलाईन व इतर कामांमुळे रस्त्याचे खोदकाम झाले, पण त्यानंतर दुरुस्ती न झाल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे.

दोन दिवसांपूर्वीच याच रस्त्यावर दुचाकी अपघातात दहावीतील विद्यार्थी जखमी झाला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सध्या अपघाताचा धोका कमी झाला असला, तरी ही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देऊन जाते. उंब्रज पोलिसांनी दाखवलेले हे ‘कर्तव्यापलीकडचे कर्तृत्व’ परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.