एटापल्ली तालुक्यातील उडेरा ते मरकल व मरकल टोला गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम दर्जेदार न होता उघडपणे चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सहसचिव कॉ. विशाल पूज्जलवार यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार एटापल्ली यांना निवेदन सादर करून थेट प्रश्न उपस्थित केला आहे की –
👉 “जुनं डांबर फोडून तेच पुन्हा टाकणं हे खरंच नियमांनुसार योग्य आहे का? आणि जर तसं असेल तर असा रस्ता किती टिकणार?”
निवेदनात म्हटले आहे की, बेस, खडी, जाडी या तांत्रिक बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून रस्त्याचं काम सुरू आहे. जुनं डांबर तसंच परत टाकून जनतेच्या पैशांची उघड उघड नासाडी होत आहे. काही महिन्यांतच हा रस्ता पुन्हा खराब होईल, हे निश्चित असल्याचं पूज्जलवार यांनी स्पष्ट केले.
आधीच तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय असून, मवेली–कुद्री–बुर्गी रस्ता असो किंवा नेंदर–पमाजिगुडा–पुरसलगोंदी मार्ग असो – लाखो रुपयांचा खर्च करून नवीन रस्ते बांधण्यात आले, पण वर्षभरातच ते खड्ड्यांनी व्यापले गेले. नागरिकांचा प्रश्न असा आहे की, जर हीच परिस्थिती कायम राहणार असेल तर मग रस्ते बांधकामाचा फायदा नेमका कोणाला होतो – गावकऱ्यांना की ठेकेदार-प्रशासनाला?
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की –
👉 “तात्काळ चौकशी करून जबाबदारी निश्चित झाली नाही, निकृष्ट काम थांबवून दर्जेदार काम सुरू झालं नाही, तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.”
या संपूर्ण प्रकरणात कॉ. विशाल पूज्जलवार (भाकपा तालुका सहसचिव) यांनी प्रशासनाला धारेवर धरत म्हटलं आहे की, “नियमांची पायमल्ली करून काम करणाऱ्यांना वाचवलं जाणार नाही. लोकांचा आवाज दाबता येणार नाही. सार्वजनिक पैशांचा हिशेब जनतेला द्यावाच लागेल.”