उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण रत्नम विनोबा भावे पुरस्काराने गौरवले.

105

जिल्हा परिषद गडचिरोली व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येणाऱ्या ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’ अर्थात विनोबा (बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा दरमहा सन्मान केला जातो. माहे ऑगस्ट २०२५ मध्ये मुलचेरा तालुक्यातील जि. प. उ. प्रा. शाळा, येल्ला येथील उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण रत्नम हे ‘पोस्ट ऑफ दि मंथ’ विजेते ठरले. त्यामुळे बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना मानाचा ‘विनोबा भावे पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षक लक्ष्मण रत्नम हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात. विविध खेळ, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आनंददायी अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत नवनवे प्रयोग घडवत आले आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना मिळाला. हा पुरस्कार पंचायत समिती मुलचेराचे गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी यावेळी विनोबा कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक चंदन रापर्तीवार आणि वि.सा.व्य. अमर पालारपवार उपस्थित होते.
सदर पुरस्कार स्वीकारतांना शिक्षक लक्ष्मण रत्नम म्हणाले, “विनोबा भावे पुरस्कार मिळाल्याने माझ्या कार्याची पावती मला मिळाली आहे. यापुढेही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करत राहीन.”