ताडगुड्याचा अभिलेख पंजी गायब; गावकऱ्यांची प्रशासनाकडे धाव – आदिवासी महासभा व कम्युनिस्ट पक्षाची ठाम मागणी

62

प्रतिनिधी//

एटापल्ली तालुक्यातील ताडगुडा (ग्रामपंचायत गर्देवाडा) या गावाला २००९ नंतरपासून अधिकार अभिलेख पंजी (अधिकार पत्रक) उपलब्ध नसल्याने गावकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. शासकीय कामकाज, सातबार उतारे, जमीन नोंदी व शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेला हा दस्तऐवज उपलब्ध न झाल्याने गावकऱ्यांना अनेकदा तहसील व उपविभागीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी महासभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे मा. उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, २००९-१० पर्यंत एटापल्ली तालुका अहेरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित होता. त्यानंतर एटापल्लीस स्वतंत्र उपविभाग मिळाल्यानंतर ताडगुडा गावाचा अभिलेख पंजी अहेरी येथेच आहे की अन्यत्र, हे स्पष्ट नाही. परिणामी, २००९ नंतर गावकऱ्यांना अधिकार अभिलेख पंजी मिळालाच नाही.

संघटनांनी मांडलेल्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
1. ताडगुडा गावाचा अधिकार अभिलेख पंजी नेमका कुठे आहे याची चौकशी करून खात्री करावी.
2. संबंधित कार्यालयातून तो अभिलेख पंजी काढून एटापल्ली तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून गावकऱ्यांना सेवा वेळेवर मिळतील.
या वेळी कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. विलास नारोटी, कॉ. मनोज नरोटी (गाव पाटील), दोडगे नरोटी यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते.
गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने कार्यवाही न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन उभारले जाईल.