आलापल्ली : राजे धर्मराव कला आणि वाणिज्य महाविद्यालय, आलापल्ली येथे बी.ए. व बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एन. टी. खोब्रागडे यांनी भूषविले. तर मार्गदर्शक म्हणून डॉ. सुर सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डोंगरे सर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष चारचाँद लागले.
सांस्कृतिक कार्यक्रमात सेव्हन सिस्टर्सच्या मोहक गीतगायनाने वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कवी संमेलनात विविध काव्यरचना सादर होऊन टाळ्यांचा कडकडाट झाला. नृत्याच्या तालावर तरुणाई थिरकली, तर गाणे ऐका आणि सिनेमाचे नाव सांगा यांसारखे आकर्षक खेळ रंगले. विशेष म्हणजे या खेळात प्राध्यापकांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांसोबत आनंद लुटला.
उत्साह, आनंद आणि एकात्मतेच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने नवागत विद्यार्थ्यांच्या आठवणीत एक अविस्मरणीय सोहळा कोरला गेला.