सुरजागड–गटटा रस्त्यासाठी जिल्हा खनिकर्म निधी का नाही?” — भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांचा सवाल

49

गडचिरोली : जिल्ह्यातील खनिज उत्खननामुळे प्रभावित क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ₹१५० कोटींचा खनिज निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती नुकतीच *लोकसत्ता*च्या बातमीत प्रसिद्ध झाली. या निधीतून प्रत्यक्ष १५ किमी व अप्रत्यक्ष १५ किमी परिसरातील दुर्गम गावांच्या पायाभूत सुविधा, शिक्षण, सिंचन, आरोग्य, रस्ते आदी कामांसाठी तरतूद आहे. मात्र, या योजनेत खनिज क्षेत्राच्या कक्षेत असलेल्या **सुरजागड ते गटटा रस्त्याचे काम मात्र पूर्णतः दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे**, असा गंभीर आरोप भाकपा जिल्हा सहसचिव तथा AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केला आहे.

कॉ. मोतकुरवार म्हणाले, “सुरजागड खदान क्षेत्राच्या कक्षेत गटटा जि.प. क्षेत्र व परिसरातील अनेक गावे येतात. या गावांसाठी सुरजागड–गटटा रस्ता हा जीवनवाहिनी असून, त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रस्त्याच्या अभावामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी यांना रोज हाल सोसावे लागतात. तरीही या रस्त्यासाठी निधी मंजूर न करता नगरपंचायत क्षेत्रातील कामांना प्राधान्य देणे, हे ग्रामविकासाविषयी अन्यायकारक व निवडक धोरणाचे उदाहरण आहे.”

भाकपाने प्रशासनाला विचारले आहे की, “खनिज उत्खननामुळे प्रभावित अनेक गावांच्या मूलभूत मागण्या नाकारून, इतर भागातील कामांसाठी निधी का दिला जातो? हे शासकीय दुर्लक्ष नाही तर खनिज उत्पन्नाचा अन्याय्य वापर आहे.”

पक्षाने स्पष्ट इशारा दिला की, जर तातडीने रस्त्यासाठी निधी मंजूर करून काम सुरू झाले नाही, तर *१५ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथे पालकमंत्री व मा. मुख्यमंत्री यांच्या घरासमोर भाकपा व ग्रामस्थ जोरदार आंदोलन करतील*