जनतेला परतण्याचा मार्ग द्या!” — चंद्रपूरहून एटापल्लीकडे सायंकाळी ५ वाजता बस सुरू करण्याची भाकपाची मागणी

67

**एटापल्ली, दि. ६ ऑगस्ट** –
एटापल्ली तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य उपचारासाठी चंद्रपूरला जाणे आवश्यक असते. मात्र, तपासण्या व उपचारानंतर सायंकाळी एटापल्लीकडे परतीसाठी कोणतीही सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे **सायंकाळी ५ वाजता चंद्रपूरहून एटापल्लीकडे जाणारी बससेवा सुरू करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) गडचिरोली जिल्हा कोन्सिलतर्फे करण्यात आली आहे.**

या मागणीसंदर्भात भाकपाच्यावतीने **मा. उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे निवेदन सादर** करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,

> “एटापल्ली तालुक्यातील अनेक नागरिक वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूरला जातात. सकाळी तेथे पोहोचणे शक्य होते, मात्र तपासण्या, औषधोपचार व इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुपार उलटून जाते. सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत काम पूर्ण होते. परंतु परतीसाठी कोणतीही बस उपलब्ध नसल्याने नागरिकांना मुक्कामी राहावे लागते, जे खर्चिक व वेळखाऊ ठरते.”

या पार्श्वभूमीवर, **संध्याकाळी ५ वाजता चंद्रपूरहून एटापल्लीकडे नियमित बससेवा सुरू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.**

या मागणीस **भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार** यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी राज्य परिवहन प्रशासनाकडे त्वरीत प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली आहे.
या निवेदनावर **AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्यासह** विजया जम्बोजवार, कॉ.जुबेदा शेख(आयटक), जयाताई पूडो, शालिनी नैताम, सरिता सोनी, निशा मोहूर्ले, वैशाली वाळके, पार्वती अंगती, राधाबाई गुमलवार, राजेश्वरी शिवरकर, मीना चिंतलवार, माया मंडरे, वर्ण भांडेकर, सुशीला शिवाकर,
व भाकपा पदाधिकारी कॉ.विशाल पूजजलवार, कॉ.तेजस गुज्जलवार, कॉ.आकाश तेलकुंटवार, कॉ.सुरज जककुलवार, कॉ.राजेश कोरंटलावार आदींच्या सह्या आहेत.

**”ही सेवा सुरू झाली तर ग्रामीण जनतेच्या वेळेची व पैशाची बचत होईल आणि आरोग्य उपचारानंतर परतीचा सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल,”** असे भाकपातर्फे सांगण्यात आले.