एटापल्ली (प्रतिनिधी) : एटापल्लीतील संस्कार पब्लिक स्कूल ही एक नामांकित व गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवली जातात. याच उपक्रमांतर्गत गोयल पब्लिकेशन आणि संस्कार पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये NEP 2020, विद्यार्थी विकास, अभ्यासात सकारात्मक बदल घडवून आणणे, तसेच ऍक्टिव्हिटी बेस शिक्षण या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख प्रशिक्षक म्हणून संचिता ब्रह्मचारी यांनी उपस्थित शिक्षकांना नवे शैक्षणिक दृष्टीकोन समजावून सांगितले आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचे महत्त्व पटवून दिले.
या वेळी गोयल पब्लिकेशनचे रिजनल हेड श्री. कैलास भोयर, संस्कार पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा संस्कार आणि संस्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय संस्कार हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत, अशा प्रशिक्षण कार्यशाळांचा शिक्षकांच्या विकासावर व त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांनी आपल्या अनुभवांची मांडणी करत या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. ही कार्यशाळा शाळेच्या शैक्षणिक दर्जात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.