#BJP#अखेर तब्बल सात दिवसानंतर त्यांचे उपोषण समाप्त

67
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आमदार कृष्णा गजबे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषणकर्त्यांनी घेतली माघार

कुरखेडा:

      कुरखेडा तालुक्यातील अवैध गौण खनिज प्रकरणी मागील सात दिवसापासून उपोसणाला बसलेल्या चेतन गाहने व राजू मडावी यांना तहसीलदार सोमनाथ माळी व उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी मागण्यासंदर्भात लिखित आश्वासन दिल्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण संपविले.

कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील अवैध रेती उपसा व अवैध विटाभट्टीसारख्या गंभीर समस्या व तालुक्यातील अवैध गौण उत्खनन करणाऱ्या लोकांवर कडक कार्यवाही करण्याच्या मागणीकरीता कुरखेडा येथील तहसील कार्यालयासमोर कुंभीटोला येथील राजू मडावी, चेतन गाहणे यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणास प्रारंभ होताच तहसील कार्यालयाकडून तुर्तास उपोषण स्थगीत करावे, अशा आशयाचे पत्र देण्यात आले होते. मात्र तरीही या दोघांनी उपोषण सुरूच ठेवले.

      कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला परिसरात अवैधरित्या रेती उपसा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात आली. मात्र याबाबत काहीच कार्यवाही झाली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत याप्रकरणी दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान आता तब्बल सात दिवसानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले व उद्या सोमवारला जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर पुन्हा एकदा आम्ही आमरण उपोषणाला बसू, असे सुद्धा सांगितले.

 
     आज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर उपोषणकर्त्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्यांनुसार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे सुद्धा सांगितले.

     यावेळी आमदार कृष्णा गजबे, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार सोमनाथ माळी, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, अॅड. उमेश वालदे, नसीर हाशमी, सागर निरंकारी प्रामुख्याने उपस्थित होते.