गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात उपवनसंरक्षक म्हणून दिपाली राजन तलमले (वनकर) यांची नियुक्ती झाली आहे.

1552

प्रतिनिधी//

आलापल्ली:अकोला येथे बालपण घालवलेल्या व सद्या नागपूरच्या रहिवासी असलेल्या दिपालीताई यांचा वनसेवेतील समृध्द अनूभव आणि अध्यापनाची प्रभावी पार्श्वभुमी यामूळे त्यांच्या नियुक्ती कडे स्थानिक जनता व पर्यावरणप्रेमी आशेने पाहत आहे. आलापल्ली, अहेरी, पिरमीली, पेडीगूड्डम, मार्कंडा, घोट व चामोर्शी या सात वनपरिक्षेत्राचा समावेश असलेल्या आलापल्ली वनविभागातील अवैध वनगुन्ह्यांवर आळा बसून वन व वन्यजीव संवर्धनासोबत वनपर्यटनाच्या गतीमान विकासाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
दिपाली तलमले यांची राज्य वन सेवा सहाय्यक वन संरक्षक पदावर 2008 साली निवड झाली, सन 2009-11 या काळात कोइंबतूर येथे वन प्रशिक्षण पुर्ण करून सहाय्यक वन संरक्षक, मूल्यांकन विभाग, नागपूर (2011-13) म्हणून सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर सहाय्यक वन संरक्षक, अवैध शिकार प्रतिबंधक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर(2013-16), सहाय्यक वन संरक्षक, वन प्रबोधिनी, चंद्रपूर (2016-17), विभागीय वन अधिकारी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर (2017-19), विभागीय वन अधिकारी (नियोजन), मुख्य वन संरक्षक (प्रा.), नागपूर कार्यालय (2019-22) येथे यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली असून विभागीय वन अधिकारी तथा वन वनसंवर्धन तज्ञ, नागपूर म्हणून कार्यरत असतांना त्यांची भारतीय वन सेवेत निवड होऊन उपवनसंरक्षक (प्रादेशिक), आलापल्ली या पदावर नियुक्ती झाली. कृषी शाखेत M.Sc.असलेल्या दिपाली तलमले यांची २००७ साली विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली होती. वनसेवेपुर्वी त्यांनी कृषी महाविद्यालयात अध्यापनाच्या क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांना अध्यापनाचा दांडगा अनुभव मिळाला. हा अनुभव स्थानीक समस्यांचा अभ्यास आणि जनतेशी संवाद साधण्यात उपयुक्त ठरणार आहे. त्यांचे पती राजन तलमले हे विभागीय वन अधिकारी या पदावर वनबल प्रमुख नागपूर या कार्यालयात कार्यरत असून त्यांचे वडील लक्ष्मण वनकर हे सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक आहेत.
जगभरात सागवान लाकडा करिता प्रसिद्ध असलेल्या व भारतीय संसद आणि राम मंदीर निर्माण करिता वापरण्यात आलेल्या सागवान लाकडाची जन्मभूमी असलेल्या आलापल्ली वनविभागाच्या स्थापनेपासून श्रीमती गिन्नीसिंह यांच्यानंतर उपवनसंरक्षक म्हणून काम करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला वनाधिकार आहेत. आलापल्ली वनविभागामधील ढिसाळ झालेल्या प्रशासनामुळे अवैध वृक्षतोड, अवैध उत्खनन आणि क्षेत्रीय वनाधिकारी यांचे मोठ्या प्रमाणावर निलंबन यावर नियंत्रण मिळवणे हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. नक्षलग्रस्त भागातील वनकामे, अवैध वनगुन्ह्यांवर नियंत्रण आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांचा वनसेवेतील प्रदिर्घ अनुभव आणि संवेदनशील दृष्टीकोन महत्वाचा ठरेल.
त्यांचा पूर्वअनूभव आणि जनतेशी संवादाची क्षमता यामूळे जनतेच्या सहभागातून वनाच्या शाश्वत विकासासोबत विकासकामांना चालना मिळेल असे सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.

दिपाली तलमले यांच्या नेतृत्वाखालील आलापल्ली वनविभागातील वन व वन्यजीव संवर्धनाच्या कामांना नवी दिशा मिळेल आणि लोकभिमूख प्रशासन असेल अशी आशा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील आलापल्ली वनविभागातील वन व वन्यजीव संवर्धनाच्या कामांना नवी दिशा मिळेल आणि लोकाभिमूख प्रशासन असेल अशी आशा आहे.