एटापल्ली शहरासाठी स्वतंत्र विद्युत फिडर आणि ट्रान्सफॉर्मरची मागणी स्वतंत्र फिडरसाठी नगरसेवकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

83

प्रतिनिधी //

गडचिरोली: एटापल्ली शहरातील नागरिक विद्युत समस्यांनी पुरते त्रस्त झाले आहेत! वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाच्या त्रासामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी या संदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यांनी पत्रव्यवहार करत एटापल्ली शहरासाठी तातडीने स्वतंत्र 11 के.व्ही विद्युत फिडर आणि नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्याची मागणी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून एटापल्लीचा विद्युत पुरवठा बोलेपल्ली फिडरला जोडलेला आहे. यामुळे शहरावर विजेचा अतिरिक्त भार येतो आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याचा फटका नागरिकांना बसतो असून, त्यांना रात्रभर अंधारात काढावी लागते, असा थेट आरोप नगरसेवक सुल्वावार यांनी केला आहे.

शहरातील घरांमध्ये आधुनिक उपकरणांचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, अपुरा विद्युत पुरवठा आणि कमी दाब यामुळे ही उपकरणे नादुरुस्त होण्याची भीती आहे. त्यामुळे एटापल्ली शहरासाठी आता स्वतंत्र 11 के.व्ही फिडर आणि अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे अत्यावश्यक आहे, असे सुल्वावार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून नगरसेवक सुल्वावार यांनी जिल्हा खनिकर्म योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निधी मिळाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

आता या मागणीवर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे एटापल्ली शहरातील त्रस्त नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा नागरिक करत आहेत.