– बंधा-याची कामे औरंगाबाद महामंडळातील कंत्राटदाराना देण्याचा घाट
जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग गडचिरोली यांनी जिल्ह्यातील साठवण बंधारे बांधण्याकरिता ई निविदा काढली आहे. या निविदेतील काही अटी, शर्ती बघता यात नमूद महामंडळ औरंगाबाद व पीडब्ल्यूडी अंतर्गत औरंगाबाद महामंडळात नोंदणी असलेल्या कंत्राटदारांनाच लाभ पोहचविण्याचा घाट संबंधित विभागाने घातला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाला येथील कंत्राटदार व अभियंत्यांच्या कामावर विश्वासच नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी उापस्थित करीत सदर निविदेतील अटी, शर्थी रद्द करण्याची मागणी केली आहे.
ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात अनेक अनुभवी नोंदणीकृत, खासगी, सरकारी कंत्राटदार आहेत. त्यांना कामाचा चांगला अनुभव असून जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव आहे. असे असतांना जिल्ह्यातील साठवण बंधारे बांधकाकामाकरिता औरंगाबाद महामंडळात नोंदणी असलेल्याच कंत्राटदाराला यात सहभागी करुन घेण्याचा विभागाचे षडयंत्र असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर कंत्राटदार काम करणा-या संबंधित विभागातील अधिका-यांच्या जवळचे असल्याने त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी येथील अधिकारी काम करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात अनेक अनुभवी, कंत्राटदार, अभियंते कामाचा योग्य दर्जा सांभाळत काम करणारे असतांना स्थानिकांना प्राधान्य न देता बाहेरच्या मंडळीना इथे काम देण्याचे प्रयोजन न समजणार असे आहे. संबंधित विभागाला येथील कंत्राटदार, अभियंत्याच्या कामावर विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित करीत निविदेतील अटी, शर्थी रद्द करुन स्थानिकांना काम करण्याची संधी द्यावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
बॉक्ससाठी…
जिल्ह्यातील कंत्राटदारावरील अन्याय खपवून घेणार नाही
जलसंधारण विभागाद्वारे औरंगाबाद येथील कंत्राटदारांना जिल्ह्यातील बंधाराचे काम देऊन येथील कंत्राटदारांवर अविश्वास दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील कंत्राटदारांना कामापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. स्थानिक कंत्राटदारावर होणारा हा अन्याय कदापीही खपूवून घेणार नाही. वेळप्रसंगी त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरु. या अन्यायकारक निविदेसंदर्भात जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांना निवेदन सादर केले आहे.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते