अहेरी, अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या गडअहेरी, गडबामणी व चेरपल्ली येथील नागरिकांना तीन किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. याबाबत अमोल मुक्कावार व वॉर्डातील नागरिकांनी नगरपंचायतला निवेदन देऊन तिन्ही वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करावा, अन्यथा घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाची दखल घेत अखेर नगर पंचायतने तिन्ही वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पायपीट थांबली आहे.
अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 14, 16 व 17 गडअहेरी, गडबामणी व चेरपल्ली येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा होत होता. परंतु दररोज काही ना काही बिघाडाचे कारण सांगून पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी सोडले जात नाही. त्यामुळे या तिनही प्रभागातील नागरिकांना दोन ते तीन किमी
अंतरावर पायपीट करून पाणी आणावे लागत होते. तिन्ही गावे नगरपंचायत क्षेत्रात येत असून येथे पाणीपुरवठा करणे नगर पंचायतीचे कर्तव्य आहे. त्यातच गावातील बोअरवेलला मुबलक प्रमाणात पाणी येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याकरिता प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. टँकरद्वारे पिण्याचे पाणीपुरवठा करण्यात यावे, तीन दिवसांच्या आत पाणीपुरवठा न केल्यास न.पं. वर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगर सेवक अमोल मुक्कावार, राहूल दुर्गे, अड. पंकज दहागावकर, प्रभाकर कुसराम, अक्षय आत्राम नागरिकांना दिला होता.