खांब उभे पण वीज गायब पुसुकपल्ली विद्युतखांब बनले शोभेची वस्तू; ६ महिन्यांपासून गाव अंधारात नागेपल्ली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

254

*पुसुकपल्ली:-* तालुका मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली येथील गावातील विद्युत खांब उभे आहेत पण वीज गायब आहे.विकासाच्या गप्पा रंगत असताना प्रत्यक्षात मात्र पुसुकपल्ली गाव आजही अंधारात चाचपडत आहे. गावातील विद्युतखांब गेल्या सहा महिन्यांपासून वीजविहीन उभे असून ते अक्षरशः शोभेची वस्तू ठरले आहेत. परिणामी सायंकाळ होताच संपूर्ण गाव काळोखात बुडत असून नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्णपणे अंधारमय आहेत. रात्री महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना बाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. परिणामी ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

नागरिकांच्या मते, अंधारामुळे साप-विंचू, अपघात आणि चोरीसारख्या घटनांचा धोका वाढला आहे.शाळा-कॉलेजमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईलच्या प्रकाशावर घरी जावे लागत असल्याची स्थिती आहे. खांब उभे आहेत, *पण वीज नाही हा विकास की विनोद?* असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.ग्रामपंचायत नागेपल्लीकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सदर ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे.पुसुकपल्ली गाव अंधारातून कधी बाहेर येणार?

हा प्रश्न आता गावातील नागरिकांना पडला आहे.