भाकपा गडचिरोली जिल्हा कौन्सिलचा सिरोंचा तालुक्यात ५ दिवसीय दौरा; जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

487

सिरोंचा : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) गडचिरोली जिल्हा कौन्सिलच्या वतीने सिरोंचा तालुक्यात ५ दिवसीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याचे नेतृत्व भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार करीत आहेत.
या दौऱ्यात कॉ. सुरज जक्कुलवार, कॉ. विशाल पुज्जलवार, सिरोंचा तालुका सचिव कॉ. रवी बारसंगडी तसेच जिल्हा कौन्सिलमधील इतर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. दिनांक ६ मार्च ते ११ मार्च या कालावधीत भाकपा पदाधिकारी सिरोंचा तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी (६ मार्च) अंकिसा भागातील नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. तर ७ मार्च रोजी टेकळा ताला येथील प्रसिद्ध कुकुमेश्वर यात्रेला भेट देऊन दर्शन घेतले व तेथील भाविक व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत विविध समस्या जाणून घेतल्या.
या यात्रेला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्रीसाठी सोलर लाईट, किचन रूम तसेच स्वच्छतागृह व स्नानगृह (संडास-बाथरूम) उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिले.
तसेच सिरोंचा तालुक्यातील ट्रान्सजेंडर बांधवांशीही भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. लवकरच गडचिरोली जिल्हा व सिरोंचा तालुक्यातील ट्रान्सजेंडर समुदायाचे संमेलन आयोजित करून त्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिली.
दरम्यान, भाकपाचा हा तालुका दौरा अजून पुढील ३ दिवस सुरू राहणार असून पदाधिकारी सिरोंचा तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी आपल्या गावातील किंवा वैयक्तिक कोणतीही समस्या असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भाकपाच्या वतीने करण्यात आले आहे.
📞 कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा गडचिरोली) – 9423660364 / 8856990364
📞 कॉ. रवी बारसंगडी (तालुका सचिव, सिरोंचा) – 9010477883