गडचिरोली :
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीचा झालेला मृत्यू ही अत्यंत हृदयद्रावक व संतापजनक घटना असून संपूर्ण जिल्ह्यात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका गरीब कुटुंबाच्या डोळ्यातील आशेचा दिवा उपचाराच्या नावाखाली विझल्याने आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
माहितीनुसार, ताप व इतर त्रासामुळे बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबीयांनी आपल्या लेकराला वाचविण्यासाठी मोठ्या विश्वासाने सरकारी रुग्णालयाचे दार ठोठावले. मात्र उपचार सुरू असताना सुरुवातीला तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले गेले, आणि काही वेळातच अचानक प्रकृती बिघडल्याचे सांगत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) ने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोकुरवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता, वैद्यकीय साधनसामग्रीचा अभाव आणि रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सामान्य जनतेचे जीव धोक्यात येत आहेत. गरीब कुटुंबांना खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याने ते सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवतात; परंतु अशा घटना हा विश्वास हादरवणाऱ्या आहेत.
या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरावीत, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी आणि रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.







