कंत्राटदारांवरील अन्यायाविरोधात एल्गार; २२ फेब्रुवारीला आलापल्ली येथे भव्य सभेचे आयोजन
अहेरी (प्रतिनिधी):
शासकीय नोंदनीकृत कंत्राटदार संघटना, उपविभाग अहेरीची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच वन विभागाच्या विश्रामगृहात पार पडली. या सभेत भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोषभाऊ ताटीकोंडावार यांची अहेरी उपविभाग अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि हक्काची लढाई लढण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणी जाहीर
या सभेत अध्यक्षपदासोबतच इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. यामध्ये:
* उपाध्यक्ष: श्री. अजयभाऊ नागूलवार
* सचिव: श्री. कैसर खान
* कोषाध्यक्ष: श्री. तनवीर सैय्यद
* उपकोषाध्यक्ष: श्री. गुड्डू कुलकर्णी
या निवडीवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रशांत कुत्तरमारे, साई बोम्मावार, नगरसेविका सौ. शालिनीताई पोहनेकर, फैजान खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच संघटनेचे सल्लागार श्री. एम.ए. हुसेन, एस.के. आझाद, बादल शाह, शकील शफी शेख आणि अविनाश बोम्मनवार यांनी मोबाईलद्वारे संपर्कात राहून या निवडीला आपला पाठिंबा दर्शविला.
अन्यायाविरुद्ध जनआंदोलनाचा इशारा
नवनियुक्त अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी आपली जबाबदारी स्वीकारताना कंत्राटदारांना आश्वस्त केले की, “अहेरी उपविभागात कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शासन दरबारी प्रखर पाठपुरावा केला जाईल. गरज पडल्यास न्यायालयीन लढाई आणि मोठे जनआंदोलन उभे करण्यास ही संघटना मागे हटणार नाही.”
विशिष्ट कंत्राटदारांच्या मक्तेदारीवर निशाणा
गेल्या तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग (आलापल्ली व सिरोंचा) आणि वन विभागांतर्गत होणारी ५० लाखांपर्यंतची कामे हेतुपुरस्सर काही ठराविक कंत्राटदारांना सोसायटीच्या माध्यमातून दिली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. १०-१० लाखांची कोट्यवधी रुपयांची कामे विशिष्ट गटाला देऊन सामान्य कंत्राटदारांवर अन्याय केला जात आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
२२ फेब्रुवारीला महत्त्वाची सभा आणि स्वागत समारंभ
संघाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी आणि नवनियुक्त अध्यक्षांच्या स्वागत समारंभासाठी रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह, आलापल्ली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेनंतर कार्यकारी अभियंता आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. या सभेला सर्व सभासदांनी न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
*अहेरी उपविभागातील शासकीय कंत्राटदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थक करणार, बाहेरील कंत्राटदारांची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही* *स्थानिक कंत्राटदारांवर कोणताही अन्याय होणार नाही सर्वांना समान न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार*
*संतोष ताटकोंडावार*
*नवनियुक्त अध्यक्ष*
*शासकीय नोंदनीकृत कंत्राटदार संघटना अहेरी उपविभाग*







