लिपिक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन

269

अहेरी | दिनांक : २४/०२/२०२६
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत लिपिक संवर्गाच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांबाबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, गडचिरोली तथा सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनातील लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असून शासनाच्या विविध योजना, आदेश व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तथापि, चौथ्या वेतन आयोगानंतर वेतनश्रेणीमध्ये निर्माण झालेली तफावत अद्याप कायम असून त्यामुळे लिपिक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही तफावत दूर करून सुधारित वेतनश्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, “लिपिक” या पदाचे “प्रशासन अधिकारी” असे नामकरण करण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या कार्याच्या व्याप्तीप्रमाणे योग्य सन्मान मिळेल, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, सन २००५ नंतर बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी, तसेच लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी शासनाने लिपिक संवर्गाच्या या सर्व मागण्यांचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. लिपिक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण कायम पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित अमोलजी मुक्कावार नगरसेवक अहेरी, श्रीनिवास जी विरगोनवर अहेरी तालुका अध्यक्ष, सुमित भाऊ मोतकुरवार, स्वप्नील भाऊ श्रीरामवर,अमोल भाऊ रामटेके, राहुलभाऊ दुर्गे,बाबूभैय्या शेख सर्व राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गटाचे)कार्यकर्ते तसेच लिपिक संवर्ग कर्मचारी उपस्थित होते