अहेरी:
महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, अशा ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती न करता विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनाच प्रशासक म्हणून पदभार कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच संघटना, अहेरी च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
ग्रामविकास विभागाच्या २३ जानेवारी २०२६ च्या पत्रानुसार, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी (कृषी, आरोग्य, शिक्षण व पंचायत) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, सरपंच संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शवत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
सध्या कार्यरत असलेले सरपंच आणि सदस्य हे स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीशी पूर्णतः परिचित आहेत. त्यामुळे त्यांनाच संधी दिल्यास दैनंदिन कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडेल. विस्तार अधिकारी (पंचायत) वगळता इतर विभागांतील अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या तांत्रिक कामकाजाचा अनुभव नसल्याने प्रशासकीय कामकाजात असमतोल निर्माण होण्याची शक्यता आहे. विस्तार अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित आहे आणि रिक्त होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. अशा स्थितीत विद्यमान लोकप्रतिनिधींना जबाबदारी दिल्यास प्रशासनाचा वेळ वाचेल आणि कामे मार्गी लागतील.लोकप्रतिनिधीं कडे पदभार राहिल्यास गावातील विकासकामे सुरळीत, पारदर्शक आणि लोकहिताच्या दृष्टीने पार पडतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
या निवेदनावर सहानुभूतिपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी नम्र विनंती सरपंच संघटनेने आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे केली आहे. निवेदन देताना निवेदन देताना अहेरी तालुक्यातील विविध गावातील सरपंच उपस्थित होते.







