एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचे उद्घाटन; गुन्हे तपास प्रक्रियेला बळ

431

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली :-आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी एटापल्ली पोलिस स्टेशन येथे अत्याधुनिक फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन (वाहन क्रमांक MH 12 YS 7922) उपलब्ध झाली असून तिचे विधिवत उद्घाटन एटापल्लीचे पोलिस निरीक्षक नागरगोजे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सहाय्यक पोलिस निरीक्षक मडावी साहेब, तसेच एटापल्ली पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे एटापल्ली तालुक्यातील गुन्हे तपास प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

सदर फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळावरील वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलन, मोबाईल फोन व डिजिटल उपकरणांची तपासणी, तसेच विविध फॉरेन्सिक प्रक्रिया थेट घटनास्थळीच पार पाडता येणार आहेत. यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता कमी होणार असून तपास अधिक अचूक व विश्वासार्ह होईल. विशेषतः सायबर गुन्हे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे, चोरी, हत्येचे प्रकार तसेच संशयास्पद मृत्यू प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक पुराव्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या दृष्टीने ही मोबाईल व्हॅन पोलिसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या सुविधेमुळे गुन्ह्यांच्या तपासासाठी लागणारा वेळ कमी होणार असून तपास यंत्रणेला गती मिळेल. तसेच गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलिस प्रशासन अधिक सक्षम व पारदर्शकपणे काम करू शकेल, असा विश्वास यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलिस निरीक्षक नागरगोजे साहेब यांनी सांगितले की, फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनमुळे ग्रामीण व दुर्गम भागातही त्वरित तपास करणे शक्य होणार आहे. त्यामुळे न्यायप्रक्रियेला बळ मिळून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल. तसेच नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, गुन्ह्यांविषयी माहिती वेळेवर द्यावी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना साथ द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.