येमली गावात एकाच दिवशी दोन आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ; तरुणासह वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू

1033

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली: तालुक्यातील बुर्गी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या येमली गावात एकाच दिवशी दोन आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनांमुळे गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना येमली येथील मुकेश रामदास मडावी (वय २७) या तरुणाच्या मृत्यूची आहे. प्राथमिक माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मुकेश हा घरातील बाथरूममध्ये बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्याची आई बाथरूमकडे गेली असता तो मृत अवस्थेत आढळून आला. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, अधिकृत कारणांचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. तरुणाच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याच गावात दुसरी घटना पिल्ली मुरा गोटा (वय ७०) या वृद्ध महिलेच्या मृत्यूची असून, त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. वृद्धावस्थेतील एकाकीपणा, आजारपण किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे का? असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी मृत्यूमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
एकाच गावात आणि त्याही एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे येमली गाव हादरून गेले आहे. मानसिक तणाव, सामाजिक व कौटुंबिक समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी समाज आणि प्रशासनाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास बुर्गी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूची नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.