अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली :- एटापल्ली नगरपंचायतीतील उपाध्यक्षा मीनाताई नागुलवार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव दणदणीत बहुमताने नामंजूर झाल्याने विरोधी गटाचा राजकीय डाव पूर्णतः फसला आहे. सत्ताधारी गटाने दाखवलेली एकजूट हीच या निकालाची खरी ताकद ठरली असून नगरपंचायतीच्या राजकारणात मोठा धक्का विरोधकांना बसला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद व औद्योगिक नगर अधिनियम 1965 अंतर्गत बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत विरोधी गटाने विकासकामांतील पारदर्शकतेचा अभाव, आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय निष्क्रियतेचे आरोप केले. मात्र ठोस पुराव्याअभावी हे आरोप केवळ राजकीय आकसातून केलेले असल्याचे सभेत स्पष्ट झाले.
यावर प्रतिक्रिया देताना उपाध्यक्षा मीनाताई नागुलवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,
“माझ्याकडे कोणतेही आर्थिक अधिकार नाहीत. विकासकामांमध्ये दुजाभाव करण्याचा प्रश्नच नाही. एकही काम सदस्यांच्या संमतीशिवाय झालेले नाही. अविश्वास ठरावाबाबत मला आधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.
*सत्ताधारी पक्षाचे गटनेते जितेंद्र टिकले* यांनीही विरोधकांवर थेट निशाणा साधत सांगितले,
“मागील अध्यक्ष अविश्वास ठरावानंतर विरोधी पक्ष केवळ वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खोटे आरोप करत आहे. मीनाताई नागुलवार यांच्या कामकाजावर एकही डाग नाही.”
मतदानात अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने अविश्वास ठराव कोसळला आणि उपाध्यक्षा पद कायम राहिले. निकालानंतर सत्ताधारी गटात जल्लोषाचे वातावरण होते, तर विरोधी गटात तीव्र अस्वस्थता दिसून आली.
या निकालामुळे एटापल्ली नगरपंचायतीतील सत्तासमीकरण अधिक मजबूत झाले असून, आता राजकीय संघर्ष नव्हे तर विकासाला प्राधान्य द्यावे, अशी स्पष्ट भूमिका सत्ताधारी गटाकडून मांडली जात आहे.







