आश्रमशाळांतील बालकांसाठी ‘गोवर-रुबेला’ लसीकरण मोहीम

137

प्रतिनिधी//

गडचिरोली, दि. 11 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व (अनुदानित/विनाअनुदानित) आश्रमशाळांमधील बालकांसाठी गोवर व रुबेला या रोगांविरोधातील लसीकरण मोहीम १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सुरू होणाऱ्या या मोहिमेतून ५ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना सुरक्षिततेचे कवच मिळणार आहे. भारत सरकारने २०२६ पर्यंत गोवर आणि रुबेला निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले असून, नुकत्याच धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यात आश्रमशाळांमध्ये गोवर उद्रेक आढळल्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनानेही या मोहिमेला प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी जिल्हास्तरीय कृती समिती बैठकीत सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

*मोहिमेची उद्दिष्टे*

या लसीकरण मोहिमेतून गोवर व रुबेला लसीकरणाचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा जास्त नेणे, लसीचे दोन डोज दरम्यानचा ड्रॉप आऊट रेट शून्यापर्यंत आणणे आणि ‘Non Measles Non Rubella Discard Rate’ प्रति लाख लोकसंख्येत २ किंवा त्यापेक्षा अधिक साध्य करणे अशी ठोस उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

*प्रमुख वैशिष्ट्ये*

या मोहिमेत आरोग्य विभागासोबत शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि महिला व बाल विकास विभागाचा सहभाग राहणार आहे. प्रशिक्षित वैद्यकीय चमूद्वारे प्रत्येक आश्रमशाळेत लसीकरण केले जाईल. गोवर आणि रुबेला हे विषाणूजन्य रोग अतिशय वेगाने पसरतात; गोवरमुळे लहान मुलांमध्ये गंभीर गुंतागुंत होऊ शकते, तर रुबेला गर्भवतींसाठी धोकादायक असून जन्मजात विकृती (Congenital Rubella Syndrome – CRS) निर्माण होऊ शकते. त्यामुळे लसीकरण हाच दोन्ही आजारांवरील प्रभावी उपाय असल्याचे आरोग्य विभागाने कळविले

*जिल्हास्तरीय कृती समिती बैठक*

या मोहिमेचे 100 टक्के यश निश्चित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक घेण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), रोशनी चव्हाण (भामरागड), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, समाज कल्याण आयुक्त डॉ. सचिन मडावी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.