एटापल्ली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी दीर्घकाळ सेवा बजावूनही नियमित सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मानधन व इतर हक्क सुविधा त्यांना नाकारल्या गेल्या आहेत. वेळोवेळी आश्वासन देऊन मागण्या प्रलंबित ठेवल्याने अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून 21 व्या दिवसापर्यंत सुरूच असल्याने ग्रामीण रुग्णालयातील व सर्व आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावरील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला.
शासनाने 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील दहा वर्षावरील सलग सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करणे बाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सदर शासन निर्णय निर्गमित होऊन सव्वा वर्षाहून अधिक कालावधी लोटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतोष पसरला आहे. मानधन वाढ, लॉयल्टी बोनस, ईपीएफ, इन्शुरन्स, बदली धोरण यासंबंधी शासनाने ठोस भूमिका न घेता सतत टाळाटाळ केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या कायदेशीर वैज्ञानिक दृष्टया न्याय्य असून तसेच मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या 20 फेब्रुवारी 2022 रोजी च्या आदेशानुसार व महामोहीम राज्यपाल यांच्या 18 फेब्रुवारीच्या अभिभाषणातील मुद्दा क्रमांक 52 नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांबाबत शासनाने कार्यवाही करण्यापेक्षा होते. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 19 ऑगस्ट पासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडली आहे. या आंदोलनात एटापल्ली तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तांत्रीक/अंतात्रीक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहे. परिणामी मागील 21 दिवसापासून तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह प्राथिमक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील सेवा प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.
सदर आंदोलनास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भुषण चौधरी व वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश नागोसे यांनी भेट दिली व संपाबाबत माहिती घेतली. यावेळी अंजूराणी बिश्वास, तुषार सोमनकर, सुधाकर श्रीरामे, दिगांबर गरमळे, शिल्पा बेपारी, तानी पुंगाटी, सुनिता गुरुनूले, मेघा नैताम, ज्योती पुलगम, पायल येडगेवार, बेबीनंद उराडे, वैशाली वेलादी, पुनम मिंज, शिल्पा बुटले, संगिता उसेंडी, संजू बांबोळे, सोनाली दुर्गे आदीसह एनएचएम कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.