एटापल्ली
नगरपंचायत एटापल्लीमध्ये सोमवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती सौ. निर्मला जयंदर कोडबत्तुलवार यांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटापल्ली शाखेतील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीनुसार, सौ. कोडबत्तुलवार या नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांपैकी असून प्रस्तुत बँकेच्या ग्राहक आहेत. दिनांक १२ ऑगस्ट रोजी त्यांनी संबंधित शाखेत आपल्या खात्यावर ठेवीची रक्कम जमा करण्यासाठी भेट दिली. त्यावेळी रोख खिडकीवर असलेल्या कर्मचारी लक्ष्मीकांत धोडके यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वर्तन केले. कोडबत्तुलवार यांनी स्पष्ट केले की, त्या नागरीक म्हणून स्वतःची कामे पार पाडण्यासाठी गेल्या असता कर्मचाऱ्यांकडून अपमानकारक शब्दांचा वापर करून त्यांना कमीपणाचा अनुभव दिला गेला.
या प्रकाराबाबत शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी देखील समाधानकारक उत्तर दिले नाही, उलट कोडबत्तुलवार यांनी सांगितलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ती किरकोळ बाब असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. यामुळे नगरपंचायत सभापतींनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी तक्रार सादर केली असून संबंधित कर्मचारी व शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सौ. कोडबत्तुलवार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बँकेचे कर्मचारी व व्यवस्थापक हे सार्वजनिक पदावर कार्यरत असून त्यांचे वर्तन हे सामान्य ग्राहकांप्रमाणेच सर्वांशी नम्र आणि सन्मानपूर्वक असणे अपेक्षित आहे. मात्र, सार्वजनिक पदाचा गैरफायदा घेत नागरिकांशी अरेरावी करणे, अपमानास्पद शब्द वापरणे आणि तक्रारीवर समाधानकारक तोडगा न काढणे ही बँकेच्या प्रतिमेला काळिमा फासणारी बाब आहे.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत असून, बँक प्रशासनाने यापुढे नागरिकांशी नम्रतेने व न्याय्यतेने वागावे अशी मागणी होत आहे. जिल्हा बँक प्रशासनाने या घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर ग्राहक संघटनांकडून आंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.