गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत संलग्न महाविद्यालयांमधील विविध शाखांतील अनेक विद्यार्थी मागील सत्रात काही विषयांमध्ये नापास झाले होते. नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर सुरुवातीला अभ्यासक्रमाचा सिलेबस व संदर्भ साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात गोंधळ निर्माण झाला. परिणामी अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने निकालांवर मोठा परिणाम झाला असून विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशात अडचणी निर्माण झाल्या. विशेषतः अंतिम वर्षाच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या संदर्भात विद्यार्थ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यापीठ सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडे समस्या मांडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे पाठपुरावा केला.
विद्यापीठ प्रशासनाने याआधी शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25 मध्ये कॅरी फॉरवर्ड पद्धत लागू केली होती, ज्याचा लाभ गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना झाला होता. मात्र नवीन धोरणामुळे अभ्यासक्रम व संदर्भ साहित्याबाबत गोंधळ निर्माण झाल्याने यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले.
गडचिरोली-चंद्रपूरसारख्या जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त भागातील अल्पशिक्षित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा एकदा कॅरी ऑन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मा. कुलगुरूंनी यावर्षीही कॅरी ऑन प्रवेश योजना तत्काळ लागू केली असून सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी नगरसेवक अमोल भाऊ मुक्कावार, सुमित मोतकुरवार, प्रा. पेंदाम, हिमा भाऊ एड., राकेश तोरे एड., जोगे यांच्यासह गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.