गोटाटोला वासीयांचा स्वातंत्र्यदिनी ठिय्या आंदोलन _गोटाटोला गावाला रस्ताच नाही,संपूर्ण गाव करणार आंदोलन_

118

एटापल्ली

भारत स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्षे झाली. देशात ‘अमृतमहोत्सव’ साजरा होत आहे. शहरांत झुलते पूल, मेगा प्रकल्प, मेट्रो रेल्वे, आणि स्मार्ट सिटी योजनेचे गोडवे गायले जात आहेत. पण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला नावाचं एक गाव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. स्वातंत्र्याचं अमृत त्यांच्यासाठी केवळ शब्दांतच आहे, प्रत्यक्षात मात्र चिखल, खड्डे, आणि अपमान.

गोटाटोला गाव सरखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं. पावसाळ्यात या गावाचा रस्ता अक्षरशः नाहीसा होतो. चिखल आणि दगडात बुडालेला मार्ग, खड्ड्यांनी भरलेली वाट, आणि निसरड्या मातीमधून चालणं म्हणजे दरवेळी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करावा लागतो. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेणं हे धाडसाचं काम ठरतं. बाईला प्रसूती आली तरी ऍम्ब्युलन्स येत नाही. लोकांनी खाटेवरून, मोटरसायकलवरून किंवा कधी पायानेच अनेक किलोमीटर प्रवास करून रुग्णालय गाठले आहे.

या गंभीर समस्येची कल्पना प्रशासनाला आहे. पण दरवेळी फक्त आश्वासनंच मिळाली. आजवर शेकडो अर्ज, निवेदने, विनंत्या काहीही उपयोग झाला नाही. रस्त्याशिवाय गाव शून्य वाटतं. ना वाहतूक, ना आरोग्यसेवा, ना शिक्षण. गावात जणू सरकारी यंत्रणांनी पाठ फिरवलेली आहे.

*”रुग्णवाहिका पोहोचत नाही; खाटेवर रुग्णांना जंगलातून दवाखान्यात नेण्याची वेळ”*

गोटाटोला गावात रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या दिवसात चिखल आणि दलदल यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अशा वेळी जर कोणी गंभीर आजारी झाला, तर रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. त्यामुळे गावकरी आपले घरातील आजारी व्यक्तीला खाटेवर झोपवून, डोक्यावर छत्री धरून, डोंगर-नाले ओलांडत जंगलाच्या वाटेने तब्बल ४ ते ५ किलोमीटर अंतर दवाखान्यापर्यंत कसेबसे नेतात. या मार्गात थोडा उशीर झाला तरी रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. ही परिस्थिती केवळ गावकऱ्यांसाठी नाही, तर त्यांच्या मुलाबाळांसाठी, वृद्धांसाठी आणि गरोदर महिलांसाठीही अत्यंत भयावह आहे.

*१५ ऑगस्टपासून गोटाटोला ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन*

गोटाटोला गावकरी आता खूप त्रासले आहेत. रस्त्याच्या समस्येमुळे खूप वर्षे ताटकळत आहेत, पण अजूनही कोणीही लक्ष देत नाही. म्हणून या वर्षी १५ ऑगस्टपासून म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून आम्ही संपूर्ण गावकरी बायका, पोरे, म्हातारे आणि जनावरेसुद्धा घेऊन उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसणार आहोत.

*”खोट्या आश्वासनांना कंटाळून गोटाटोला ग्रामस्थांचा निवडणूक बहिष्काराचा इशारा”*

गोटाटोला गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या समस्येबाबत आपली व्यथा लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे मांडली, अनेकदा गाऱ्हाणं घातलं. मात्र, प्रत्येकवेळी केवळ गोड शब्द आणि खोट्या आश्वासनांनी गावकऱ्यांना फसवण्यात आलं. प्रत्यक्षात काहीच काम झालं नाही. या फसवणुकीला कंटाळून आता गावकऱ्यांनी ठाम निर्णय घेतला आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल आणि एकही मत टाकणार नाही. “विकासाच्या नावाने मतं घेतली, पण आम्हाला रस्ता देखील मिळाला नाही,” असा तीव्र संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हा निर्णय ही केवळ नाराजी नसून, लोकशाहीवरचा एक मोठा सवाल निर्माण करणारा आवाज आहे.

_”गोटाटोला गावाच्या रस्त्याची परिस्थिती ही अक्षरशः माणसाच्या जगण्याच्या हक्कावर गदा आणणारी आहे. आम्ही शासन दरबारी अनेक वेळा धाव घेतली, निवेदनं दिली, पत्रकारांमार्फत आवाज उठवला पण आजवर केवळ आश्वासनंच मिळाली. गावकऱ्यांनी आता निर्णय घेतला आहे की रस्ता होईपर्यंत आम्ही आमचं जगणं प्रशासनाच्या नजरेत आणण्यासाठी ठाण मांडून बसणार. हे फक्त आंदोलन नाही, तर जगण्याची लढाई आहे.”_

*रमेश दुग्गा*
*माजी,उपसरपंच,ग्राम पंचायत सरखेडा*