प्रतिनिधी//
*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते धनादेश वितरण*
अहेरी:कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याची दखल घेत अहेरीच्या नगरपंचायत प्रशासनाने आपल्या हद्दीतील १५ अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांना अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते प्रोत्साहनपर रकमेचे धनादेश वितरण केले.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, मुख्याधिकारी गणेश शहाणे,राकॉचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,राकॉचे अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी तसेच नगरपंचयातचे बांधकाम सभापती विलास गलबले,महिला व बालकल्याण सभापती नौरास शेख,पाणीपुरवठा सभापती महेश बाकेवार,नगर सेविका ज्योती सडमेक,नगर सेवक अमोल मुक्कावार,सुरेंद्र अलोने तसेच नगर पंचायतीचे आदी कर्मचारी उपस्थित होते.
२०१९ मध्ये देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला होता. या कालावधीत अंगणवाडी सेविकांना सर्वे करण्याचे काम देण्यात आले होते. घरोघरी जाऊन कोरोनाविषयक सर्वे, लोकशिक्षण सल्ला, रेडी टू कुक फूडचे वाटप, पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करणे,सोबतच विविध विषयांवर प्रबोधन करणे असे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविकांनी केली. हे सर्व करतानाच सहा वर्षाच्या आतील बालकांचे आरोग्य, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरी सक्षमीकरण, लसीकरण, कुपोषण, अनौपचारिक शिक्षण अशा वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी तब्बल १८ महिने काम केले.
या १८ महिन्याच्या कालावधीत त्यांना सरकारने प्रोत्साहनपर रक्कम (महिन्याचे १ हजार) देण्याचे ठरविले होते.मात्र ही रक्कम नगरपंचायतच्या खात्यातील वित्त आयोगाच्या निधीवर जमा झालेल्या व्याजाच्या रकमेतून खर्च करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने २०२३ मध्ये नऊ महिन्याचे प्रोत्साहनपर रक्कम (प्रत्येकी ९ हजार) यांचे धनादेश वितरण केले होते. उर्वरित ९ हजार रुपयांचा धनादेश २७ जुलै रोजी नगरपंचायतच्या सभागृहात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते वितरित केले.
यावेळी नगरपंचायत हद्दीतील १५ अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस उपस्थित होते.आ.धर्मराव बाबा आत्राम त्यांच्या कोरोना काळातील कार्याची प्रसंशा करत त्यांच्याशी आस्थेने संवाद साधत साधले.त्यांनी देखील मनमोकळेपणाने संवाद साधत समस्या सांगितली त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे आ. आत्राम यांनी शब्द दिले.