दुर्गंधी, घाण, आणि आरोग्याचा घात – एटापल्ली मटण मार्केटच्या प्रश्नावर भाकपाचा आक्रमक इशारा

150

प्रतिनिधी//

**एटापल्ली, जि. गडचिरोली** – एटापल्ली नगर पंचायत हद्दीतील मटण मार्केट परिसर सध्या दुर्गंधी, सांडपाणी, आणि साफसफाईच्या अभावामुळे गंभीर आरोग्य संकटाचा केंद्रबिंदू बनला आहे. या ठिकाणी रोज शेकडो लोकांची ये-जा असते, पण प्रशासन मात्र या परिसराकडे केवळ दुर्लक्ष करत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही, ना उपाययोजना झाली, ना जबाबदारी निश्चित करण्यात आली. परिणामी, हा प्रश्न आता केवळ स्वच्छतेचा नसून, *जनतेच्या आरोग्य हक्काचा आणि प्रशासनाच्या जनविरोधी वृत्तीचा* प्रश्न बनला आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, शहराध्यक्ष कॉ. तेजस गुज्जलवार यांनी मांडलेले मुद्दे आणि इशारे हे प्रशासनाला स्पष्टपणे सावध करणारे आहेत.

### **मार्केट परिसर आरोग्याला घातक ठरत आहे**

एटापल्ली मटण मार्केटमध्ये नाल्यांची सफाई केली जात नाही, सांडपाणी रस्त्यावरून वाहते, कुत्रे आणि माशांचे थैमान असते, तर परिसरात दुर्गंधीने नागरिकांचे राहणे मुश्कील झाले आहे. आजूबाजूच्या भागात राहणारे नागरिक, व्यापारी आणि सामान्य ग्राहक – सर्वजण त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध, आणि आजारी नागरिक यांना याचा सर्वाधिक फटका बसतोय.

### **प्रशासनाच्या भांडवली मानसिकतेचा निषेध**

**कॉ. तेजस गुज्जलवार म्हणाले –**
*”हे प्रशासन केवळ संख्याशास्त्र पाहतं, माणसं नाही! एखाद्या ठिकाणी किती नफा होतो, किती उत्पन्न मिळतं, हाच त्यांच्या कामकाजाचा निकष झाला आहे.

### **भाकपाच्या ठोस आणि जबाबदार मागण्या**

भाकपाने केवळ टीका करून थांबण्याऐवजी ठोस उपाययोजना समोर मांडल्या आहेत. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

1. **मटण मार्केटची तात्काळ व नियमित स्वच्छता, तसेच निर्जंतुकीकरण करण्यात यावे.**
2. **मटण विक्रीसाठी ठराविक जागा, संरक्षित पद्धती, आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित व्यवस्था उभी करावी.**
3. **या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती, प्रशासनाने केलेली/न केलेली कारवाई यांचा सविस्तर अहवाल आम जनतेसमोर मोकळेपणाने प्रसिद्ध करण्यात यावा.**

### **प्रशासनाचे मौन म्हणजे सहकार्य**

भाकपाने असा सवाल उपस्थित केला आहे की, जर प्रशासनाने एवढ्या स्पष्ट तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई केली नाही, तर यामागे कोणाचे हितसंबंध आहेत? दुकानदारांचे आरोग्याच्या निकषांकडे दुर्लक्ष करत व्यवसाय सुरू राहावा, याला मूक संमती देणारे अधिकारी कोण? आणि या सर्व प्रक्रियेवर जनतेच्या पैशातून चालणाऱ्या यंत्रणा गप्प का?

### **संघर्षाची चेतावणी**

**कॉ. तेजस गुज्जलवार पुढे म्हणाले –**
*”जर तात्काळ उपाययोजना झाली नाही, तर आम्ही केवळ निवेदने देऊन थांबणार नाही. भाकपा रस्त्यावर उतरेल, परिसरातील आम जनतेला संघटित करेल, आणि जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आंदोलनाच्या केंद्रस्थानी आणेल. ही लढाई एका मार्केटची नाही, ही लढाई आहे – आम जनतेच्या जीवित हक्कासाठी!”*

— मटण मार्केट जवळ माझा घर असल्याने मटण मार्केट मधील काही वेस्ट कचऱ्याची दुर्गंधी माझ्या घरापर्यंत येत असून आमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो?वारंवार तक्रार करण्यात येत असून
प्रशासन दुर्लक्ष करीत आहे

*गणेश आनंदराव खेडेकर*
प्रतिष्ठित नागरिक
एटापल्ली