प्रतिनिधी//
*एटापल्ली*
एटापल्ली शहरात पावसाळ्याची चाहूल लागल्यापासून डासांचा प्रचंड प्रादुर्भाव निर्माण झाला असून आरोग्य समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत. त्वचारोग, मलेरिया, डेंग्यू आणि तापासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नगर पंचायत प्रशासनाने अद्यापही डास नाशक फवारणीसारख्या प्राथमिक उपाययोजना सुरू केलेल्या नाहीत. परिणामी शहरातील बहुतांश भागांमध्ये नागरिकांना डासांच्या त्रासामुळे नित्याचा जीव घ्यावा लागत आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक ठिकाणी साचलेले पाणी, कचऱ्याचे ढीग, गटारांची वेळोवेळी सफाई न होणे आणि निर्जंतुकीकरणाची संपूर्णपणे अनुपस्थिती यामुळे डासांची पैदास झपाट्याने होत आहे. या परिस्थितीचा थेट फटका लहान मुलांना आणि वयोवृद्धांना बसत असून, अनेक भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांत ताप आणि त्वचाविकारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. कुठल्याही प्रकारची तत्काळ किंवा दीर्घकालीन उपाययोजना न केल्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. काही रहिवाशांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, “सण-उत्सवांच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करणारे प्रशासन, नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत गरजांकडे मात्र डोळेझाक करीत आहे. डासांचा त्रास इतका वाढला आहे की संध्याकाळी घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे.”
अनेक भागांतील महिलांनी आणि नागरिक संघटनांनी नगर पंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर डास नाशक फवारणी, नाल्यांची साफसफाई, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि सार्वजनिक स्वच्छता यावर ठोस उपाययोजना न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
एटापल्लीसारख्या दुर्गम तालुक्यात आरोग्य सेवा आधीच मर्यादित असताना, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आजारांचा धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भिती आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत. शहरवासीयांची ही व्यथा ऐकून आरोग्य व स्वच्छता विभागाने जागे होणे आवश्यक आहे, अन्यथा या समस्येचा स्फोट होणे अटळ आहे.
*शहरवासीयांच्या प्रमुख मागण्या*
एटापल्ली शहरात डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्वचारोग, मलेरिया व डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरिकांच्या मते, या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने पुढील उपाययोजना तातडीने राबवाव्यात:
1) डासनाशक औषधांची तातडीने फवारणी
2) साचलेल्या पाण्याची आणि नाल्यांची नियमित स्वच्छता
3) प्रत्येक प्रभागात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन
4) नागरिकांच्या सहभागातून जनजागृती मोहीम
या मागण्या पूर्णत्वास गेल्यासच एटापल्ली शहर गंभीर आरोग्य संकटातून वाचू शकेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
*मुख्याधिकाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्ष : नागरिकांमध्ये तीव्र संताप*
दरम्यान, नागरिकांनी आणि वैद्यकीय विभागाने वेळोवेळी सूचना देऊनही नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. डास नाशक फवारणी, नाल्यांची साफसफाई आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत उपाययोजनांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या पत्रव्यवहारानंतरही अद्याप प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, मुख्याधिकाऱ्यांच्या या उदासीनतेमुळे शहरातील आरोग्य संकट अधिकच गंभीर होत आहे. प्रशासनाचे हे असं वागणं जनतेच्या जीवाशी खेळ करणारे असून, जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर जनआंदोलन अटळ असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
_”आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण नगर गंभीर साथीच्या आजारांच्या विळख्यात सापडू शकते. सध्या डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने वेळ न घालवता तातडीने फवारणी, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना हाती घ्याव्यात, अन्यथा आरोग्य संकट टाळता येणार नाही.”_
*तेजस गुज्जलवार,नागरिक*
“एटापल्ली शहरात डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या मलेरिया आणि तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून, अनेक जण मलेरिया पॉझिटिव्ह येत आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नाल्यांची तातडीने साफसफाई करणे, ब्लिचिंग पावडर टाकणे आणि डास निर्मूलनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत पत्राद्वारे कळवले आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण हे सगळ्यांचे प्राथमिक कर्तव्य असून प्रशासनाने या बाबतीत तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.”
*डॉ. राकेश नागोसे*
*वैद्यकीय अधिकारी,तोडसा*