प्रतिनिधी//
एटापल्ली:- एकीकडे पावसाळ्याची चाहूल लागली असताना, एटापल्ली नगरपंचायतीचे घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र दिसत आहे. शहरात जिकडे-तिकडे कचऱ्याचे ढिगारे साचले असून, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिक या त्रासातून कधी मुक्त होणार, असा संतप्त सवाल विचारत आहेत.
पावसाळ्यापूर्वीच घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना, एटापल्ली नगरपंचायत आणि नगराध्यक्ष या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “आम्ही दररोज या दुर्गंधीत जगत आहोत. नगरपंचायत काय करतेय?”, असा सवाल एका संतप्त नागरिकाने केला.
*पावसाळ्यानंतरच जाग येणार का?*
नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वीच स्वच्छतेची मोहीम राबवणे आवश्यक असताना, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. “एटापल्ली नगरपंचायत आणि नगराध्यक्ष पावसाळ्यानंतर तरी घनकचरा व्यवस्थापन करणार का?”, असा उपरोधिक सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
या गंभीर समस्येकडे नगरपंचायतीने तातडीने लक्ष देऊन, नागरिकांना या दुर्गंधीतून आणि संभाव्य आजारांच्या धोक्यातून लवकरात लवकर मुक्त करावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
*नगरपंचायत क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून, त्याआधी शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ही प्राथमिक कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी दिली.*