एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात मोकाट जनावरांचा त्रास — नागरिकांचे जीव धोक्यात; भाकपाच्या वतीने प्रशासनाला इशारा

185

एटापल्ली, दिनांक २१ जून २०२५ :
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर दिवसेंदिवस मोकाट गुरेढोरे मोकाटपणे फिरत असून, यामुळे सामान्य नागरिकांचे आणि वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकी वाहनचालक यांना अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वेळा अपघात होण्याच्या घटना घडलेल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एटापल्ली शहर सचिव कॉ. तेजस गुज्जलवार यांनी आज नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली. मोकाट जनावरांमुळे नगरातील स्वच्छता, वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास भाकपाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नगरपंचायतीने स्वतंत्र टीम तयार करून मोकाट जनावरांवर कारवाई करावी, जनावरांचे मालक शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच जनावरांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.