गडचिरोली, (जिमाका) दि. ३० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दि. १ जून २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी या उद्देशाने गडचिरोली शहरातील आठ परीक्षा केंद्रांभोवती २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशांनुसार, खालील कृत्यांवर परीक्षा कालावधीत बंदी घालण्यात आली आहे :
परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एस.टी.डी. बूथ सुरू ठेवता येणार नाहीत.
मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर बंदी घालण्यात आली आहे.
नारेबाजी करणे, भाषण देणे, घोषणाबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे यास मनाई आहे.
पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमवून गर्दी करता येणार नाही.
शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यास वापरता येतील अशा वस्तू बाळगता येणार नाहीत.
कोणताही ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ परिसरात नेता येणार नाही.
परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात चुन्याची स्पष्ट ओळ आखण्यात यावी.
हा आदेश कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेल्या अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यावर लागू होणार नाही.
पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांना परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक पोलिस बंदोबस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाईल. हा आदेश फक्त परीक्षेच्या दिवशी, म्हणजेच १ जून २०२५ रोजी अमलात राहील, असे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे.