गडचिरोली शहरात मध्यरात्री हत्तींची ‘एन्ट्री’

216

प्रतिनिधी//

गडचिरोली

मागील काही महिन्यांपासून गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यांतील जंगलात वास्तव्यास असलेल्या दोन रानटी टस्कर हत्तींनी आज मध्यरात्री चक्क गडचिरोली शहरात प्रवेश केला. रात्रभर त्यांनी राष्ट्रीय महामार्गासह गल्लीबोळातूनही फेरफटका मारला.

मध्यरात्रीनंतर दोन टस्कर हत्तींनी वाकडी-मुडझाच्या जंगलातून गडचिरोली शहरातील गोकुळनगर वॉर्डात प्रवेश केला. त्यांनी तेथील एका दुकानाचे नुकसान केले. एवढ्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन हत्तींना हाकलण्याचा प्रयत्न केला. हे हत्ती शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळून पोटेगाव बायपासमार्गे मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षक कार्यालयाचे दर्शन घेत लांझेडा वॉर्डात पोहचले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरुन त्यांना अमिर्झा परिसरातील जंगलात हुसकावून लावण्यात आले, असे उपवनसंरक्षक मिलीशदत्त शर्मा यांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी हेच हत्ती रांगी, गिलगावमार्गे आरमोरी तालुक्यातील मानापूर गावात पोहचले होते. त्यावेळी हत्तींना पाहून घाबरल्याने एक महिला खाली पडून जखमी झाली होती.