अहेरी;- तालुक्यातील रेपनपल्ली येथे दारूची वाहतूक करणारी जीप पोलिसांनी पकडली. यावेळी ४२ हजार रुपयांच्या दारूसह जीप असा एकूण आठ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आलापल्लीकडून सिरोंचाकडे मालवाहू जीपमधून (एमएच ३४ बीझेड ०९०७) दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती रेपनपल्ली पोलिसांना कळाली होती. त्यानुसार, उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी सहकाऱ्यांसह रेपणपल्ली येथे सापळा लावला. यावेळी संशयित जीप येताच अडवून झडती घेतली.
तत्पूर्वी पोलिसांना पाहून जीप सोडून चालकाने पोबारा केला. जीप ताब्यात घेतली असून गुन्हा नोंदविला आहे. उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांच्यासह अंमलदार व्यंकट यादव, गणेश गंगले, देवरथ गयाली यांचा कारवाईत सहभाग होता.