प्रतिनिधी//
गडचिरोली, दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत गडचिरोली जिल्ह्याने आपली ठसा उमटवणारी कामगिरी सिद्ध केली आहे. या मोहिमेच्या मूल्यांकनात गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने उत्कृष्ट कार्य करत १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकांच्या सेवा सुलभतेसाठी उचललेली पावले, तसेच कार्यालयीन पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा केल्यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकनात एकूण दहा निकषांवर कार्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यात कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण यंत्रणा, वेबसाईट कार्यक्षमता, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकाभिमुख सेवा अशा विविध बाबींचा समावेश होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, “ही गुणवत्ता मोहिम केवळ सुरुवात आहे. ही एक चळवळ होऊन नागरिकांना उत्तम सेवा देणारे सक्षम प्रशासन घडवण्याचे उद्दिष्ट आहे.”